वैचारिक प्रगल्भता आणि व्यावहारिकता याला माणुसकीची जोड असणे नितांत गरजेचे आहे. न शिकलेली माणसं अज्ञानी असतात व शिकलेली माणसं ज्ञानी असतात, असे म्हणणे देखील चुकीचे आहे. प्रत्येक ठिकाणी स्वार्थ पाहता येत नाही, पाहू नये. समाजाच्या विद्यापीठात काम करताना नि:स्वार्थ, विवेक व नम्रता इत्यादी मानवी मूल्य तितकेच महत्त्वाचे असतात. सारेकाही स्वतःसाठी ही भावनाच ‘ मी माणूस आहे ‘ या पासून दूर घेऊन जाणारी आहे. अशी डॉ.म.ई.तंगावार यांची विचारधारा आहे.
डॉ.म.ई.तंगावार इ.स.२००८ पासून महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात उदगीर येथील श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील मराठी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सात स्वलिखित व सात संपादित ग्रंथ त्यांचे प्रकाशित आहेत. सा.साधना, योजना, नवभारत, अस्मितादर्श, विचारशलाका, कवितारती, भाषाभान यासारख्या नियतकालिका बरोबरच दै. लोकमत, सकाळ, एकमत, सामना, तरुण भारत सोलापूर, गावकरी, लोकाशा, यशवंत, महिला एकजूट तसेच संपादित व गौरव ग्रंथातून त्यांचे जवळपास दोनशे लेख प्रकाशित आहेत. तुका म्हणे, जीवनगाणे, सावित्री वदते ही सदर मालिका प्रत्येक आठवड्याला एक याप्रमाणे २४ महिने त्यांनी दैनिकातून चालविली. विद्यार्थ्यासाठी आविष्कार या पुरवणीचे सहा महिने समन्वयक म्हणून काम केले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या लघुशोध प्रकल्प बरोबरच पदव्युत्तर वर्गासाठी प्रकरणाचे लेखनही त्यांनी केले. ब्लॉग लेखन देखील ते करतात. याबरोबरच निवेदक, वक्ते म्हणूनही ते ज्ञात आहेत. ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणी परभणी केंद्रावरून त्यांचे ५२ कार्यक्रम प्रसारित झाले आहेत.
वारकरी संप्रदाय,स्वाध्याय परिवार, शेतकरी संघटना, हुंडाबंदी प्रबोधन, वाचक संवाद, महाराष्ट्र बसव परिषद इत्यादी सामाजिक तसेच क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्राशी देखील त्यांचा अनुबंध आहे. संगीत व आध्यात्मिक यासारख्या क्षेत्राशी अगदी सुरुवातीच्या काळात त्यांचा सक्रीय सहभाग होता. विविध समाजोपयोगी कार्यक्रम व उपक्रमात ते स्वतः पुढाकार घेत असतात. सहिष्णुता, विज्ञाननिष्ठा, हे विचार रूजविण्यासाठी त्यांची धडपड असते.